तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’
साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले.
राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.
राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे." राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला .
तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली "राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. " राजे धळाधळा रडू लागले.
साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले " राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? " राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात " हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको."
शिलालेख
कृष्णाजी अनंत सभासद विरचित ‘शिवछत्रपतिंचे चरित्र.’ (छत्रपति शिवरायांचा प्रथम चरित्रकार) कलम ८७, राज्याभिषेक : त्याऊपर वेदमूर्ती गागाभट वाराणीसकर येऊन रायेगडी (रायगडावर) याहेस्वामीस (शिवाजी महाराजांस) मुंजी बंधन (मुंजकरून) पटाभेषक सिंहासनारूढ झाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे (संवत्सर) चैत्र सुध (शुद्धं) प्रतिपदा शुक्रवार.
मंत्री दत्तजी त्रिमल वाकेनिविस विरचित ’९१ कलमी बखर’‘शाके षण्णव बाण भूमि गणानादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त किर्ती महिते शुक्लेष सार्पे तिर्थो’।
रायगड निर्मिती समयी (राज्याभिषेकाचे वेळी) श्री शिवरायांच्या आज्ञेने रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादात लावलेल्या शिलालेखातील उल्लेख. अर्थ. असा, ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ गणल्या जाणार्याड अशा ‘शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्धं त्रयोदशी’ या शुभदिनी शिवरायांना राज्याभिषेक झाला. जेस्ष्ट श्रुध (शुद्धं) १२ श्रुक्रवार (शुक्रवार) घटी २१ पले ३४ वी ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्रं उरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ १० रबिलवल सु॥ खमस सबैन अलफ.- जेधे शकावली.
श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना तिथीनुसार राजाभिषेक झाला.
आजच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.
जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य पुन्हा स्थापन आणि सक्षम करण्यासाठी जमेल तिथे जमेल त्या प्रकारे प्रयत्न करूयात.